Next Deputy Chief Minister: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘झंझावात’ शांत झाला असला, तरी सत्तेच्या वर्तुळातील हालचालींनी आता वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात निर्माण झालेली निर्नायकी अवस्था संपवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद देऊन अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीमध्ये सुरू आहे.
बड्या नेत्यांची खलबतं: पक्षाची कमान कुणाकडे?
बारामतीतील अंत्यविधी आटोपल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत केवळ सांत्वनच नाही, तर पक्षाच्या भवितव्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे, तर सत्तेतील वाटा आणि उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे, असा नवा फॉर्म्युला तयार केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि पक्षाची ताकद विखुरली जाऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
‘सुनेत्रा अजित पवार’ नावाचं भावनिक कार्ड
नरहरी झिरवळ यांनी यापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली असून, आता कार्यकर्त्यांमधूनही हाच सूर उमटत आहे. “ज्या पदावर ‘अजित अनंतराव पवार’ हे नाव होतं, तिथे आता ‘सुनेत्रा अजित पवार’ हे नाव येणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी भावना बारामतीतील समर्थकांनी व्यक्त केली आहे. आता दादांच्या निधनानंतर रिकामे झालेले उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते सुनेत्रा वहिनींकडे जाणार का? आणि महायुतीतील इतर घटक पक्ष याला कशी संमती देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


