Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ३०) एकमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिकेचे दैनंदिन कामकाज, वार्षिक अंदाजपत्रक, प्रभागातील विकासकामे, त्यासाठी होणारा खर्च, स्थायी समितीकडून घेतली जाणारी मंजुरी तसेच सभागृहातील कामकाज या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अजित पवार यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संमती दिली.
या बैठकीत आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. महापालिकेतील कामकाज अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याबाबत त्यांनी विविध सूचना केल्या.
दरम्यान, शनिवारी (ता. ३१) विभागीय आयुक्तांकडे भाजपची गटनोंदणी करण्यात येणार असून, अद्याप कोणत्याही पदासाठी नाव निश्चित करण्यात आले नसल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली.


