Ajit Pawar Last Video: राज्याचे कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, आता त्यांचा एक भावूक व्हिडिओ समोर आला आहे. विमान अपघाताच्या अवघ्या काही तास आधी रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, ‘दादां’चे ते शेवटचे शब्द ऐकून समर्थकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
“मी शब्दाचा पक्का…”
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधण्यासाठी अजित पवारांनी हा व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्यांच्यातील तोच करारीपणा आणि स्पष्टवक्तेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणतात, ‘मी शब्दाचा पक्का आणि केवळ कामाचा माणूस आहे. एकदा दिलेला शब्द पाळणे, हीच माझी खरी ओळख आहे. शेती, पाणी, रस्ते आणि तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी जिल्हा परिषद हेच विकासाचे मुख्य केंद्र आहे,’ असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाची ग्वाही दिली होती. विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी या संदेशाद्वारे दिला होता.
प्रचारासाठी पाऊल पडले अन् काळाने झडप घातली
हा व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्यानंतर अजित पवार बारामतीच्या दिशेने प्रचारासाठी निघाले होते. याच प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि महाराष्ट्राचा एक मोठा नेता काळाच्या पडद्याआड गेला. हा संदेश त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ‘अंतिम निरोप’ ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
भावूक आवाहन आणि समर्थकांची हळहळ
व्हिडिओच्या अखेरीस अजित पवार हात जोडून मतदारांना साद घालताना दिसतात. ‘गावाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रवादीला संधी द्या,’ असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून ‘शब्द पाळणारा नेता हरपला’ अशी भावना व्यक्त केली जात आहे.


