Indorikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्येच्या भव्य लग्नसोहळ्याचे. इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि नवी मुंबईतील उद्योजक सुनील चिलप यांचे सुपुत्र साहिल यांचा विवाह उद्या, रविवारी 3 मे रोजी संपन्न होत आहे.
विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
संगमनेरमधील गुंजाळवाडी परिसरात हा शाही विवाह पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 100 एकर जागेवर भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ लग्नच नाही तर या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळणार आहे. विवाहापूर्वी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर मुख्य लग्नसोहळा पार पडेल.
राजकीय आणि धार्मिक नेत्यांची मांदियाळी
या विवाह सोहळ्याला राज्यभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, दिग्गज राजकीय नेते आणि वारकरी संप्रदायातील संत-महंत या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या साखरपुड्याच्या भव्यतेवरून समाजमाध्यमांवर इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दुसऱ्याला साधेपणाचा सल्ला देणारे स्वतः मात्र शाही थाट करतात, अशा आशयाच्या कमेंट्सद्वारे त्यांना ट्रोल करण्यात आले होते. मात्र, या टीकेला न डगमगता महाराजांनी साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य असेल असे जाहीर केले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणेच आता हा सोहळा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे.


