Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीने क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. चाकण परिसरातील म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 3 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने केवळ अत्याचार करून न थांबता चिमुरड्याचा गळा चिरून त्याला संपवले. या संतापजनक घटनेमुळे परिसरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
आरोपी अल्पवयीन, बिहारचा रहिवासी
या प्रकरणाचा तपास करताना म्हाळुंगे पोलिसांनी एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी मूळचा बिहार राज्यातील असून, पीडित चिमुरड्याचे कुटुंब मध्य प्रदेशातील आहे. हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी चाकण परिसरात मजुरीसाठी आले होते. एका अल्पवयीन मुलानेच अशा प्रकारचे अघोरी कृत्य केल्याने समाजमनातून संताप व्यक्त होत आहे.
नराधमाला फाशी द्या!
दुसरीकडे, भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज गावकऱ्यांनी ‘नसरापूर बंद’ पुकारला. ग्रामस्थांचा संताप इतका अनावर होता की, पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आरोपीला तात्काळ फाशी द्या, अन्यथा त्याला आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
एकामागून एक दोन घटनांनी पुणे सुन्न
काल भोरमध्ये चिमुरडीचा बळी गेला आणि आज चाकणमध्ये चिमुरड्याची हत्या झाली. अवघ्या 24 तासांत घडलेल्या या दोन घटनांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.


