पुणे : राज्याला हादरवणाऱ्या विमान अपघातात अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले होते. खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता.
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली होती. लाखो चाहते, समर्थक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या घटनेला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नाच-गाण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांत विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
शोककाळात मनोरंजन कार्यक्रम कितपत योग्य?
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात अजूनही शोककाळाचे वातावरण असताना, अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणं योग्य आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयावर नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या कार्यक्रमांबाबत महापालिकेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हंटलंय पत्रकात?
कामगार कल्याण विभाग,
पुणे महानगरपालिका.
जावक क्र. एलओ / 8006 दिनांक : 03/02) 202E
विषय – दिनांक 15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे आयोजित कार्यक्रम
पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे दि.15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी/सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये नृत्य (वैयक्तिक व समुहनृत्य), नाटक, ऑर्केस्ट्रा (हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम), वादन, वैयक्तिक कलागुण व छायाचित्र / हस्तचित्र/ कलाकृती प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी, ज्या अधिकारी/सेवकांना वर नमूद केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी दिनांक 10/02/2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपली नावे कामगार कल्याण विभागाकडे खालील तक्त्यामध्ये पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


