Arush Joshi : पुण्यातील एका १० वर्षीय चिमुकल्याने जागतिक नावलौकिक मिळवला आहे. पाचवीत शिकणाऱ्या आरुष जोशी याने अंतराळ संशोधनात मोठी कामगिरी बजावत चक्क दोन नवीन लघुग्रहांचा शोध लावला आहे. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या मुख्य पट्ट्यात (Asteroid Belt) हे लघुग्रह सापडले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या शोधाची अधिकृत दखल घेण्यात आली आहे. आरुषच्या या कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
नासा संलग्न संस्थेची (IASC) अधिकृत मोहोर
आरुषने नासाशी संबंधित असलेल्या ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन’ (IASC) या जागतिक उपक्रमात सहभाग घेतला होता. अडीच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आरुषने आपल्या टीमसह अंतराळातील हे दोन घटक शोधून काढले आहेत. सध्या या लघुग्रहांना 2024 OQ 27 आणि 2024 OB 28 अशी तात्पुरती नावे देण्यात आली आहेत. ‘मायनर प्लॅनेट सेंटर’ने या शोधाची पडताळणी केली असून, पुढील काही वर्षे त्यांच्या कक्षेचे निरीक्षण केले जाईल. कक्षा पूर्णपणे निश्चित झाल्यानंतर या लघुग्रहांना स्वतः आरुषचे नाव देण्याचा बहुमान त्याला मिळू शकतो.
पुस्तकांपासून दुर्बिणीपर्यंतचा अद्भूत प्रवास
लहानपणापासूनच ताऱ्यांच्या जगाचे वेड असलेल्या आरुषने केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष निरीक्षणावर भर दिला. “माझ्याकडे 150 मिमी व्यासाची दुर्बीण आहे. त्यातून मी चंद्र, ग्रह आणि अँड्रोमेडा दीर्घिकेचे तासनतास निरीक्षण करतो. याच छंदातून मला संशोधनाची प्रेरणा मिळाली,” असे आरुषने मोठ्या अभिमानाने सांगितले. केवळ १० व्या वर्षी ‘सिटिझन सायंटिस्ट’ (Citizen Scientist) म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आरुषचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
आरुषच्या या यशानंतर त्याच्यावर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालेय वयातच अंतराळ विज्ञानासारख्या कठीण विषयात रस घेऊन जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणे ही साधी बाब नाही. पुण्याच्या या चिमुकल्याने थेट अंतराळात नाव कोरण्याची तयारी केल्यामुळे खगोलप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातून त्याचे विशेष अभिनंदन केले जात आहे. भविष्यात तो अंतराळ विज्ञानात मोठी भर घालेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


