कोटा (राजस्थान) : राजस्थानमधील कोटा शहरात भीषण दुर्घटना घडली असून जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक इमारत अचानक कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन बांधकामाधीन इमारती कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इमारत कोसळताच आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांची धावपळ सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेनंतर तब्बल दीड तास उशिरा पोलिस मदत कार्यासाठी पोहोचल्याने जखमींना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे आले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
या दुर्घटनेवर राजस्थानचे मंत्री मदन दिलावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाशी संपर्कात असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
५ ते ७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.” दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


