आपल्या शरीराला प्रथिने अर्थात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, आयर्न यांसारख्या घटकांची गरज असते. हे घटक मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो. त्यात प्रथिने हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. ते अमिनो आम्लांपासून बनलेले असते जे शरीरातील पेशी आणि ऊती तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करतात.
प्रोटीन हाडे मजबूत करतात आणि गरज पडल्यास ऊर्जाही देतात. प्रोटीन फक्त मांस, अंडी किंवा दूध यासारख्या पदार्थांमधून मिळतात, असे म्हटले जाते. मात्र, हे खरं नाही. आपल्या घरात आढळणारे लहान बियाणे देखील प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यापैकी काही बिया इतके प्रथिनेयुक्त असतात की त्यांचे प्रथिने प्रमाण अंड्याइतकेच मानले जाते. एका अंड्यामध्ये अंदाजे ६ ते ७ ग्रॅम प्रथिने असतात. त्यात सनफ्लॉवर्स सिड्स ज्याला सूर्यफुलाच्या बिया म्हणूनही ओळखले जाते, ते एक हेल्दी नाश्ता मानले जाते. २८ ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमध्ये अंदाजे ६ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन-ई आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते, जे पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. तुम्ही ते कच्चे किंवा हलके भाजलेले खाऊ शकता.
तसेच भांग बिया देखील फायद्याच्या मानल्या जातात. त्या दिसायला लहान असू शकतात, परंतु ते पोषक तत्वांनी भरलेले असतात. फक्त ३ चमचे भांग बियाणे अंदाजे १० ग्रॅम प्रथिने प्रदान करतात. त्यामध्ये सर्व नऊ आवश्यक अमीनो आम्ले असतात, ज्यामुळे ते संपूर्ण प्रथिने बनतात. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी आम्ले आणि मॅग्नेशियम देखील असतात. तुम्ही भांगाच्या बिया सॅलड, सूप, स्मूदी किंवा ओटमीलवर शिंपडून तुमच्या आहारात सहजपणे समाविष्ट करू शकता.


