Chhatrapati Sambhajinagar : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने आज शहरात एका परीक्षा केंद्रावर खळबळजनक प्रकार पाहायला मिळाला. सकाळी ९:३० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सात वाजेपासूनच उमेदवारांचे रिपोर्टिंग सुरू झाले होते. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा पथकाने तपासणी करताना कमालीची कडक भूमिका घेतली. “अंगावर कोणतेही धातूचे दागिने असतील तर प्रवेश मिळणार नाही,” असे स्पष्ट बजावण्यात आल्याने विवाहित महिलांच्या मंगळसूत्राचाही प्रश्न ऐरणीवर आला. कानातले, नाकातले आणि विशेषतः मंगळसूत्र काढल्याशिवाय आत सोडले जाणार नाही, या केंद्र चालकांच्या भूमिकेमुळे केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला.
एकट्या आलेल्या महिलांची ओढाताण
सुरक्षेच्या नावाखाली करण्यात आलेल्या या अतिरेकी कारवाईमुळे महिला परीक्षार्थींची मोठी तारांबळ उडाली. ज्या महिलांसोबत त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी आपले दागिने त्यांच्याकडे सोपवले; मात्र लांबून एकट्या प्रवास करून आलेल्या महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. आपले मौल्यवान दागिने अनोळखी ठिकाणी किंवा बॅगेत ठेवणे अत्यंत जोखमीचे असल्याने अनेक महिलांची धावपळ झाली. या मानसिक त्रासामुळे काही महिलांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला, तर काहींनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि रडत रडत आपले दागिने काढून केंद्रात प्रवेश केला.
उमेदवार आणि पालकांचा तीव्र संताप
प्रशासनाच्या या असंवेदनशील भूमिकेवर उमेदवार आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सुरक्षा महत्त्वाची असली तरी, मंगळसूत्रासारख्या धार्मिक आणि वैयक्तिक भावना जोडलेल्या गोष्टींबाबत प्रशासनाने आधीच स्पष्ट सूचना द्यायला हव्या होत्या,” अशी भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली. ऐन परीक्षेच्या वेळी अशा प्रकारच्या गोंधळामुळे उमेदवारांवर मानसिक दडपण येते, असे मत पालकांनी मांडले. एकूणच, नियमांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन आणि संवेदनशीलता जपली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


