Solapur ZP Election Results: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, माढा तालुक्यातील भोसरे गटात आमदार संजयमामा शिंदे यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या गटासह गणातील तिन्ही जागांवर शिंदे समर्थकांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. ७ फेब्रुवारीला झालेल्या ६६.१५ टक्के मतदानानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच संजयमामांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.
भोसरे गटाचा निकाल: राष्ट्रवादी (शिंदे गट) वरचढ
भोसरे जिल्हा परिषद गटात अश्विनी दळवे (राष्ट्रवादी- शिंदे गट) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या शर्मिला उबाळे यांचा पराभव केला. या विजयामुळे माढ्यातील स्थानिक राजकारणात संजयमामा शिंदे यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
इतर महत्त्वाच्या गटांमधील लढती
भोसरे गटाव्यतिरिक्त माढ्यातील इतर सहा गटांमध्येही अत्यंत अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सत्तेसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. मानेगाव गटात भाजपचे पृथ्वीराज सावंत आणि राष्ट्रवादीचे सुहास पाटील यांच्यात थेट संघर्ष आहे, तर उपळाई बु. गटात भाजपच्या माधुरी मोरे यांना राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या हर्षदा पाटील यांचे तगडे आव्हान लाभले आहे.
दरम्यान, मोडनिंब गटात भाजपच्या वंदना कांबळे आणि राष्ट्रवादीच्या प्रभावती शिंदे यांच्यात वर्चस्वाची लढाई होत आहे. टेंभुर्णी गटात भाजपच्या अमृता वाढे यांची लढत राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या अंजनादेवी पाटील यांच्याशी होत असून, बेंबळे गटात भाजपच्या रोहिणी ढवळे आणि शिवसेनेच्या सविता कोकाटे आमनेसामने आहेत. तसेच कुर्डू गटात राष्ट्रवादीचे संभाजी ढाणे आणि राष्ट्रवादी (श.प.) गटाचे बाळासाहेब ढेकणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भारतीय जनता पक्षानेही मोठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भोसरे गटाचा निकाल हा संजयमामा शिंदेंसाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे.


