Revati Sule Marriage : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे नागपूरचे व्यावसायिक सारंग अरुण लखानी यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे रेवती सुळे आता नागपूरची सून होणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या असून विजय सुळे हा त्यांचा भाऊ आहे. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics) येथून उच्च शिक्षण घेतले आहे. नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
राजकीय वर्तुळात या विवाहाची चर्चा सध्या चांगलीच रंगली असून, अनेक मान्यवरांकडून सुळे कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


