HSC Exam 2025-26 News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) आजपासून, १० फेब्रुवारीपासून, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार असून राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८,२०,२२९ मुले, ७,१२,२४० मुली आणि १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही नोंदणी राज्यातील १०,६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून करण्यात आली असून, परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात ३,३८७ मुख्य परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.
बारावी परीक्षा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नंदकुमार बेडसे म्हणाले की, प्रचलित पद्धतीनुसार ‘माहिती तंत्रज्ञान’ आणि ‘सामान्य ज्ञान’ या दोन विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी २,३६,३२०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी १,७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीतील १२ वी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून UDISE डेटाच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी ३ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून महत्त्वाच्या विषयांच्या पेपरदरम्यान आवश्यक तेवढा खंड देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी फक्त मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी राज्य मंडळ स्तरावर १० समुपदेशक, तर विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच राज्य मंडळ व नऊ विभागीय मंडळांमध्ये नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक असून सकाळ सत्रासाठी १०.३० वाजता आणि दुपार सत्रासाठी २.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत आहेत. काही परीक्षा केंद्रांवर CCTV च्या माध्यमातून परीक्षा कॅमेऱ्याखाली घेतली जाणार असून, गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.


