Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राजकारण चांगलेच तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या घटनेमागे मोठे गूढ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून एक ‘राजकीय रहस्य’ असल्याचे सांगत राऊतांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
विमानाचा ‘सूरत’ कनेक्शन आणि संशयास्पद हालचाली
राऊत यांनी अपघाताच्या क्रोनोलॉजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, जे विमान आदल्या दिवशी गुजरातच्या सूरतमध्ये होते, तेच दुसऱ्या दिवशी अचानक बारामतीत येते आणि कोसळते, हा योगायोग असू शकत नाही. या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी पुरेशी नाही, तर एका तटस्थ यंत्रणेद्वारे तपास होणे गरजेचे आहे.
पूर्व विदर्भातील ‘तो’ नेता कोण?
यावेळी राऊत यांनी एका अज्ञात नेत्याकडे निर्देश करत गंभीर प्रश्न उपस्थित केले:
- अजित पवारांना भेटायला उशिरा येणारा पूर्व विदर्भातील तो प्रभावी नेता नेमका कोण?
- त्या नेत्याने पवारांचा कारने जाण्याचा प्रवास रद्द करून विमानाने जाण्याचा आग्रह का धरला?
- अशी कोणती महत्त्वाची फाईल होती, ज्यावर स्वाक्षरी करण्यासाठी एवढी घाई करण्यात आली? त्या नेत्याची चौकशी झालीच पाहिजे, मग तो भाजपचा असो वा राष्ट्रवादीचा, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
पवार कुटुंबाच्या दिल्ली दौऱ्यावर टीका
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना राऊतांनी सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला दिल्लीत कोणीही भेटायला येत नाही, त्यांना प्रफुल्ल पटेलांच्या घरी नाश्त्यासाठी जावे लागते, यावरूनच पक्षात काय चालले आहे हे स्पष्ट होते. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी तिथे फूट पडल्याचे स्पष्ट दिसते, असे ते म्हणाले.
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
संसदेतील वातावरणावर भाष्य करताना राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, लोकसभा अध्यक्ष भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत असून विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाला शिवसेना (UBT) पूर्ण पाठिंबा देईल.
आंतरराष्ट्रीय संदर्भातून टोला
ब्रिटीश पंतप्रधानांवरील दबावाच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊतांनी भारतीय राजकारणावर उपरोधिक टिप्पणी केली. ब्रिटनमध्ये दबावामुळे राजीनामे दिले जात असतील, पण आपल्या देशात नैतिकतेचा किंवा दबावाचा विचार कोण करतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


