Jalna Crime: “लोक आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, त्यापेक्षा आपण एकत्र जीवन संपवूया,” असे भावनिक आवाहन करत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारात उघडकीस आली आहे. आत्महत्येचा बनाव रचून प्रेयसीचा काटा काढणाऱ्या बाबासाहेब छगन राठोड याला गोंदी पोलिसांनी अटक केली आहे.
प्रेमाचा प्रवास आणि संसाराचा हट्ट
आरोपी बाबासाहेब राठोड आणि मृत सुरेखा आन्वीकर यांची ओळख १० वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी झाली होती. दोघेही विवाहित असूनही त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सुरेखाचे पतीसोबत वाद असल्याने तिने घर सोडले होते आणि ती बाबासाहेबसोबत राहण्यासाठी आग्रही होती. मात्र, स्वतः विवाहित असलेल्या बाबासाहेबला तिला कायमचे सोबत ठेवणे कठीण जात होते. सुरेखाचा वारंवार होणारा लग्नाचा तगादा टाळण्यासाठी त्याने तिला कायमचे संपवण्याचा क्रूर कट रचला.
कालव्याकाठी रचला मृत्यूचा सापळा
रात्रीच्या सुमारास बाबासाहेबने सुरेखाला नालेवाडी येथील डाव्या कालव्यापाशी बोलावले. तिथे तिला भावनिक जाळ्यात ओढत “आपण दोघेही एकत्र आत्महत्या करू” असा बनाव रचला. आणाभाका घेत दोघांनीही कालव्यात उडी घेतली. मात्र, बाबासाहेबला पोहता येत असल्याने तो काही मिनिटांतच सुखरूप बाहेर आला, तर पोहता येत नसलेली सुरेखा डोळ्यांदेखत पाण्यात बुडाली.
अन् अवघ्या १० मिनिटांत आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात पोहचला!
सुरेखाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह अर्ध्यावर पाण्याबाहेर ओढला. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्याने थेट गोंदी पोलीस ठाणे गाठले आणि आपण दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कथा रचली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी आणि घटनास्थळाची पाहणी केली असता, हा आत्महत्येचा प्रयत्न नसून थंड डोक्याने केलेला खून असल्याचे स्पष्ट झाले.
नियोजित हत्येचा पर्दाफाश
पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयास्पद वर्तणुकीवरून बाबासाहेबला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १० वर्षांच्या विश्वासाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


