Pune News: येथील मेंगडेवाडी परिसरात बिबट्याची हालचाल पुन्हा एकदा समोर आल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रणपिसे वस्ती जवळ माजी सरपंच भरत फल्ले यांच्या शेतात रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसला.
दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने शनिवार (दि. ७) रोजी त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.
रविवारी सकाळी भरत फल्ले शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता पिंजऱ्याच्या आसपासच बिबट्या वावरताना त्यांच्या निदर्शनास आला. पिंजऱ्यात भक्ष ठेवूनही बिबट्या त्यात अडकला नसल्याने वन विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.
विशेष म्हणजे बिबट्याने दिवसा दर्शन दिल्यामुळे परिसरातील शेतकरी अधिकच सतर्क झाले असून, शेतात एकटे जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


