Nashik Crime: कुंडलीतील ग्रहांची दिशा बदलण्याचे आमिष दाखवून आणि शेअर बाजारात भरघोस नफ्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका व्यावसायिकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन देशमुख नावाच्या एका भामट्याने आपण माजी NSG कमांडो असल्याची खोटी ओळख सांगून गुंतवणूकदारांचे सुमारे 73 लाख रुपये हडपले असून, सध्या तो फरार आहे.
ग्रहांच्या फेऱ्यात अडकवून घातला गंडा
नाशिकमधील एका 48 वर्षीय किराणा दुकानदाराला या संशयिताने आपल्या जाळ्यात ओढले. “तुमचे सध्याचे ग्रह फिरले असून, तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक केली तर मोठे धनलाभ होतील,” असा अजब सल्ला त्याने दिला. आपला प्रभाव पाडण्यासाठी तो ज्योतिषशास्त्राचा वापर करायचा आणि लोकांच्या कुंडल्या पाहून त्यांना आर्थिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करायचा.
डिजिटल जाळे आणि १० महिन्यांची लूट
ही फसवणूक एप्रलि 2025 ते फेब्रूवारी 2026 या सुमारे 10 महिन्यांच्या कालावधीत पद्धतशीरपणे करण्यात आली. सचिन देशमुख केवळ प्रत्यक्ष भेटीवर अवलंबून न राहता, ‘Zoom’ मीटिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे वर्ग घ्यायचा आणि त्यांचे प्रबोधन करायचा. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आपण देशाचे रक्षक म्हणजेच NSG कमांडो असल्याचे बनावट ओळखपत्र आणि माहिती पसरवली होती.
तक्रारींचा ओघ वाढला; आकडा कोट्यवधींत जाण्याची भीती
गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर परतावा मिळणे बंद झाले आणि संशयित देशमुखचा फोनही बंद लागला, तेव्हा पीडित व्यावसायिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नाशिक सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत 20 हून अधिक जणांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. पोलिसांच्या मते, हा आकडा केवळ 73 लाखांवर थांबणारा नसून, तो कोट्यवधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
पोलीस तपासाला वेग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे एक विशेष पथक फरार सचिन देशमुखचा शोध घेत आहे. अशा प्रकारे कुणीही आमिष दाखवल्यास नागरिकांनी बळी पडू नये आणि आपली फसवणूक झाली असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.


