Pune Crime: सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी अजब शक्कल लढवली असून, पुण्यात एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 6,70,37,500 रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. घराच्या ड्रेनेज लाइन दुरुस्तीच्या साध्या कामापासून सुरू झालेला हा सिलसिला थेट न्यायाधीश आणि बँक मॅनेजरच्या नावाने धमकावण्यापर्यंत पोहोचला आणि यात तक्रारदाराने आपली आयुष्यभराची पुंजी गमावली.
कसा रचला फसवणुकीचा सापळा?
तक्रारदार हे 61 वर्षीय असून ते ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नवी पेठेतील घराच्या ड्रेनेज तपासणीसाठी संदीप चव्हाण नावाचा व्यक्ती आला होता. त्याने आपण महापालिकेचा अधिकारी असल्याचे भासवून स्वतंत्र ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी प्रारंभी केवळ 65,000 रुपयांची मागणी केली. मात्र, इथूनच फसवणुकीला सुरुवात झाली.
धमकावून आणि भावनिक साद घालून लुटले
आरोपींनी जून 2025 पर्यंत विविध कारणांनी तक्रारदाराकडून पैसे उकळले. आरोपींनी पोलीस, बँक अधिकारी आणि चक्क न्यायाधीश असल्याची बतावणी करून तक्रारदारावर दबाव टाकला. मशिन डिपॉझिट, पालिकेचे चलन आणि न्यायालयीन शुल्काच्या नावाखाली वारंवार पैसे मागितले. तसेच आरोपींनी स्वत:च्या मुलाचे ऑपरेशन, घरात झालेला मृत्यू अशी खोटी आणि भावनिक कारणे सांगून कोट्यवधी रुपये उकळले.
विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित अधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी संदीप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी, शर्मा, राऊत, महाजन आणि काही अज्ञात बँक मॅनेजर व तोतया न्यायाधीशांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी अधिकारी किंवा पोलीस असल्याचे भासवून कोणी पैशांची मागणी केल्यास किंवा अटकेची भीती दाखवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


