Narhari Zirwal: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीच्या कारवाईला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याने, मंत्र्यांचे खाजगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरूनच लाच मागितली, अशी धक्कादायक कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमका आरोप काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या चौकशीत आरोपी ढेरंगेने तपासाची दिशा मंत्र्यांच्या दालनाकडे वळवली आहे. मंत्र्यांचे पीएस रामदास गाडे यांच्यासाठीच हे पैसे गोळा केले जात असल्याचा दावा आरोपीने केल्याने आता तपासाची व्याप्ती वाढली आहे.
नरहरी झिरवळ यांचे प्रत्युत्तर
या गंभीर आरोपानंतर मंत्री झिरवळ यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात माझी किंवा माझ्या कार्यालयाची ‘लिंक’ प्रत्यक्षपणे सिद्ध झाली, तर मी एका मिनिटात मंत्रीपदाचा राजीनामा देईन. मी इतका मोठा नाही की मला कोणी टार्गेट करेल, पण सत्याची चौकशी व्हावी. विभागात असा प्रकार घडणे चुकीचेच आहे, त्याची नैतिक जबाबदारी मी नाकारत नाही. पण गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यानुसार त्याला जाब द्यावाच लागेल.’ तथापी, मंत्रालयातील दालन सील केल्याच्या अफवांचे त्यांनी खंडन केले असून, कार्यालय नियमित सुरू असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दाद मागणार
या प्रकरणात पीएसचे नाव गोवल्या गेल्याने प्रशासन बॅकफूटवर आले आहे. नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, ते तातडीने मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.


