Sankarshan Karhade: मराठी मनोरंजन सृष्टीतील अष्टपैलू अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या नाटकांच्या दौऱ्यांमुळे सातत्याने चर्चेत आहे. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत राहण्याचे कारण व्यावसायिक नसून वैयक्तिक आणि अत्यंत आनंदाचे आहे. संकर्षणच्या घरात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून, संपूर्ण कऱ्हाडे कुटुंबात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.
नेमकी ‘गुड न्यूज’ काय?
संकर्षणचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अधोक्षजने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. संकर्षण आणि अधोक्षज हे दोघेही दिसायला अतिशय सारखे असून, आता कऱ्हाडे घराण्याची पुढची पिढी घरात आल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ट्रेडिंग नावांपेक्षा वेगळी निवड: ‘नारायण’
आजकालच्या काळात मॉडर्न आणि हटके नावांची मोठी क्रेझ असताना, कऱ्हाडे कुटुंबाने पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीची जपवणूक केली आहे. अधोक्षजने आपल्या मुलाच्या नावाबाबत चाहत्यांची उत्सुकता संपवली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले की, “सध्या पाळण्यातलं नाव ‘नारायण’ ठेवलं आहे! बारसं झाल्यावर अधिकृत नाव सांगेनच, पण हे नाव अतिशय अर्थपूर्ण आहे.” या वेगळ्या आणि पारंपारिक नावाचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत असून, “ट्रेडिंग नावांच्या गर्दीत ‘नारायण’ नाव ऐकून मनाला समाधान वाटलं,” अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
पोलिसांसोबतचा ‘तो’ प्रसंगही चर्चेत
नाटकाच्या दौऱ्यादरम्यान संकर्षणला नुकताच एक सुखद अनुभव आला. रात्रीच्या वेळी पोलिसांनी त्याची गाडी थांबवली होती. सुरुवातीला संकर्षण थोडा घाबरला, पण पोलिसांनी केवळ त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गाडी थांबवली असल्याचे समजल्यावर त्यालाही आनंद झाला. खाकी वर्दीतील चाहत्यांचे हे प्रेम पाहून संकर्षण भारावून गेला होता.
अधोक्षजचा अभिनय प्रवास
संकर्षणप्रमाणेच त्याचा भाऊ अधोक्षज देखील अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. सध्या तो ‘कमळी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’, ‘पिंकीचा विजय असो’ आणि ‘लाडकी विहिण योजना’ या नाटकातून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.


