Oscars 2026: चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९८ व्या अॅकॅडमी पुरस्कार (Oscars 2026) सोहळ्यात यंदा पॉल थॉमस अँडरसन यांच्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ या चित्रपटाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल १३ नामांकने मिळालेल्या या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या सर्वोच्च किताबासह एकूण ६ मानाच्या ट्रॉफींवर आपले नाव कोरले. दुसरीकडे, सर्वाधिक १६ नामांकने मिळवून शर्यतीत आघाडीवर असलेल्या रायन कूगलर यांच्या ‘सिनर्स’ या चित्रपटाला ४ पुरस्कारांवरच समाधान मानावे लागले.
अभिनयाचा जलवा: जॉर्डन आणि बकलीने मारली बाजी
या वर्षीच्या सोहळ्यात अभिनयाच्या श्रेणीत अपेक्षेप्रमाणे दिग्गज कलाकारांचा गौरव झाला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: ‘सिनर्स’ चित्रपटातील आपल्या दमदार आणि कसदार अभिनयासाठी मायकल बी. जॉर्डन याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (मुख्य भूमिका) म्हणून गौरवण्यात आले.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: ‘हॅम्नेट’ या चित्रपटातील भावस्पर्शी भूमिकेसाठी जेसी बकली हिने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा किताब पटकावत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
दिग्दर्शन आणि तांत्रिक विभागातील विजेते
पॉल थॉमस अँडरसन यांनी केवळ चित्रपटासाठीच नव्हे, तर ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ आणि ‘सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा’ अशा वैयक्तिक श्रेणींमध्येही बाजी मारली. तांत्रिक विभागात ‘फ्रँकेन्स्टाईन’ चित्रपटाचा दबदबा राहिला; या चित्रपटाने वेशभूषा, मेकअप आणि प्रोडक्शन डिझाइनमध्ये यश मिळवले. अपेक्षेप्रमाणे व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी (VFX) ‘अवतार: फायर अँड ॲश’ हा चित्रपट विजेता ठरला.
ऑस्कर २०२६: प्रमुख विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: वन बॅटल आफ्टर अनदर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका): मायकल बी. जॉर्डन (चित्रपट: सिनर्स)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका): जेसी बकली (चित्रपट: हॅम्नेट)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: पॉल थॉमस अँडरसन (चित्रपट: वन बॅटल आफ्टर अनदर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: शॉन पेन
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: एमी मॅडिगन (चित्रपट: वेपन्स)
- सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: सिनर्स (लेखक: रायन कूगलर)
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा: वन बॅटल आफ्टर अनदर (लेखक: पॉल थॉमस अँडरसन)
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट: के-पॉप डेमन हंटर
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट: सेंटिमेंटल व्हॅल्यू
- सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम: अवतार: फायर अँड ॲश
- सर्वोत्कृष्ट मूळ गीत: गोल्डन


