Pune Dog Attack: पुणे जिल्ह्यातील चाकण अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास एकटी पाहून भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका 32 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौकाजवळ एका 32 वर्षीय महिलेचा भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शोभा विजय वाघमारे असे या मृत महिलेचे नाव असून, ती या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाहा VIDEO
Pune | चाकणनध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू | Mararhi News#punenews #viralvideo #dogattack #ndtvmarathi #marathinews #maharashtranews #maharashtrapolitis #marathibatmya pic.twitter.com/QH73jn8vPQ
— NDTV Marathi (@NDTVMarathi) March 16, 2026
मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा वाघमारे या पहाटे 2 च्या सुमारास उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या. यावेळी अचानक सहा ते सात कुत्र्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला चढवला. शोभा यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र झुंडीने त्यांना चोहोबाजूंनी घेरले. सुमारे 15 मिनिटे ही कुत्री महिलेवर तुटून पडली होती. हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर जखमा झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे शोभा यांचा जागीच मृत्यू झाला.
सीसीटीव्हीमुळे सत्य आले समोर
सकाळी जेव्हा स्थानिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला, तेव्हा परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. हा घातपात किंवा अत्याचाराचा प्रकार असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चाकण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा हल्ला भटक्या कुत्र्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.
संकरित कुत्र्यांचा संशय?
स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही नागरिकांच्या मते, या भागातील कुत्री अधिक हिंसक असून ती लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरित जातीची असावीत, असा संशयही व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी एकट्या-दुकट्या व्यक्तीने बाहेर पडणे आता जीवावर बेतू लागले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर चाकण नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.


