Maharashtra Gas Shortage: राज्यात सध्या जाणवणारा घरगुती गॅसचा (LPG) तुटवडा आणि सिलिंडरसाठी सर्वसामान्यांची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गॅस उपलब्ध नसल्यास पर्यायी इंधन म्हणून आता थेट पेट्रोल पंपांवर केरोसिन (रॉकेल) उपलब्ध करून दिले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळात या संदर्भात माहिती दिली. या निर्णयामुळे गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या गृहिणींना आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेट्रोल पंपांवर विक्री आणि भेसळ रोखण्यासाठी नवी योजना
राज्यातील गॅस टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून सरकारने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, रॉकेलमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ते अधिकृत डिलर्सऐवजी थेट BPCL, HPCL आणि IOCL यांसारख्या नामांकित पेट्रोलियम कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर विकले जाणार आहे. उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त इतर नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी सरकार आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल.
गॅस उत्पादनात वाढ आणि पुरवठ्याचे नवे प्राधान्यक्रम
मंत्री भुजबळ यांनी पेट्रोलियम कंपन्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सभागृहात मांडताना सांगितले की, राज्यातील गॅस उत्पादन दिवसाला 9000 मेट्रिक टनवरून 11000 मेट्रिक टन करण्यात आले आहे. पुरवठ्याबाबतही नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, घरगुती ग्राहकांनंतर उरलेला गॅस रुग्णालय, वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था आणि स्मशानभूमींना 100 टक्के प्राधान्याने दिला जाईल. तसेच, औषध उद्योग आणि लष्करी कॅन्टीनसाठी 50 टक्के पुरवठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काळाबाजारावर कठोर कारवाई: भरारी पथके तैनात
एलपीजीच्या टंचाईचा फायदा घेऊन सुरू असलेल्या काळाबाजारावर सरकारने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये 1208 गॅस सिलिंडर आणि सुमारे 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. “गॅस टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहोत. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांची सोय म्हणून केरोसिनचा पर्याय दिला जात आहे,” असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.


