Shivalik Vessel reach Mundra Port: मध्य पूर्वेतील संघार्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. कतारमधून मोठ्या प्रमाणात एलपीजी घेऊन निघालेले भारतीय जहाज ‘शिवालिक’ सोमवारी सायंकाळी ५:०० वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले. मध्यपूर्वेतील संघर्षमय परिस्थितीनंतर पर्शियन आखातातून भारतात पोहोचणारे हे पहिलेच मोठे गॅसवाहू जहाज ठरले आहे.
नौवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,शिवालिक हे जहाज सुमारे ४५,००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात दाखल झाले आहे. हा साठा किती मोठा आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, हे प्रमाण साधारणपणे ३२ लाख घरगुती गॅस सिलिंडर भरण्यासाठी पुरेसे आहे. १४ मार्च रोजी या जहाजाने अत्यंत संवेदनशील समजली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली.
नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन आखातात भारताच्या २२ जहाजे अडकली आहेत. या जहाजांवर एकूण ६११ भारतीय खलाशी कार्यरत असून ते सर्व पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या २४ तासांत या भागात कोणतीही विपरीत घटना घडली नाही. सरकार प्रत्येक जहाजाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
एलपीजी पाठोपाठ भारताची कच्च्या तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ‘जग लाडकी’ हे जहाज देखील भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. हे जहाज १४ मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीमधून भारताकडे निघाले असून १७ मार्ज रोजी मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सचिव सिन्हा यांनी दिली. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर होऊ नये, यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. शिवालिकचे यशस्वी आगमन आणि जग लाडकीचा सुरू असलेला प्रवास हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आणि सागरी वाहतूक सुरू ठेवण्याच्या निर्धाराचे मोठे यश मानले जात आहे.


