पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना जाहीर झाला आहे. डॉ. गिते यांच्या या निवडीमुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि निस्पृह कार्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे.
मुंबईत रंगणार दिमाखदार गौरव सोहळा
या पुरस्काराचा वितरण सोहळा २५ आणि २६ मार्च २०२६ रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. गिते यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, महिला व बालविकास मंत्री माधुरी मिसाळ आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्यसनमुक्ती चळवळीतील अतुलनीय योगदान
डॉ. सोमनाथ गिते यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले आहे. समाजजागृती, योग्य मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी हजारो व्यसनी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना नवे जीवन दिले आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्याची दखल
डॉ. गिते यांचे कार्य केवळ राज्यापुरते मर्यादित नसून, त्यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रमांची नोंद आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद झाली आहे. यापूर्वी त्यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न, सेवादूत आणि राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. या नव्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाले असून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


