Raj Thackeray Gudi Padwa Melava: मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, त्यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
इराण-इस्रायल संघर्षावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, इराणने अनेक वर्षे भारताला साथ दिली आहे. अशा वेळी इराणवर हल्ले होत असताना भारताने त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. तसेच भारताला मोठ्या प्रमाणात तेल इराणकडून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नसल्याची टीकाही त्यांनी केली. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर इराण भारताच्या पाठीशी उभा राहिला होता, मात्र भारताने त्यांना साथ दिली नाही. याचे परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
इन्स्टाग्राममधून बाहेर पडा…
आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. आयपीएल, पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळे आखले आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावे, मग कुणीही विचार करणार नाही. पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
महापुरुषांच्या कार्याचा गौरव
आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी योगदान असलेल्या व्यक्तिमत्वांची यादी वाचवून दाखवली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक महान लोकांची नावे घेतली. त्याचवेळी त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचा वाटा आहे त्यांचीही यादी वाचून दाखवली. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वि स पागे, संघाचे हेगडेवार, वि का राजवाडे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित मेहंदळे यांच्या नावांचा आणि कार्याचा गौरव राज ठाकरे यांनी केला. आपल्याकडे या महान लोकांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण त्यांचे विचार कधीही घेतले जात नाहीत. महाराष्ट्र हा प्रतिमेत अडकल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.


