Rupali Chakankar : नाशिकमधील कथित कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी तीव्र झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी “रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली” अशी पोस्ट करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. या पोस्टनंतर पुण्यासह राज्यभरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर माध्यमांसमोर न आल्यानेच ही पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्यानंतर या प्रकरणाने मोठे राजकीय रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर खरातसोबतचे काही राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने वाद अधिक चिघळला आहे.
या प्रकरणावरून संजय राऊत, सुषमा अंधारे आणि इतर विरोधी नेत्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीच थेट अशा प्रकारची पोस्ट केल्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.
चाकणकर आणि अशोक खरात यांचे विविध कार्यक्रमांतील फोटो, तसेच कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, आता यावर चाकणकर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


