Maharashtra Unseasonal Rains : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्र मधील नागपूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. नागरिकांची धावपळ उडाली असली तरी सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे.
नागपूर शहरात अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात आणखी पावसाचा इशारा दिला आहे. सोलापूर मध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात अचानक हवामान बदलून जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाले, तर मेहकर, लोणार आणि चिखली भागात गारपिटीमुळे केळी, संत्रा आणि निंबू यांसारख्या फळपिकांसह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाखा बसून आंब्यांच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गळ झाली आहे. परिणामी यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात गहू, मका, ज्वारी आणि बाजरी पिके जमीनदोस्त झाली आहेत. जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीमुळे गहू, हरभरा, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तब्बल दोन इंच गारांचा खच साचल्याचेही चित्र समोर आले आहे.
एकूणच, काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने “तोंडाशी आलेला घास हिरावला” अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी पंचनामे करून भरपाई जाहीर करावी, अशी मागणी राज्यभरातून जोर धरत आहे.


