Ashok Kharat Case: नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली असून, त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. खरात हा केवळ ‘भोंदू’ नसून तो एक ‘विकृत’ प्रवृत्तीचा माणूस आहे, असा घणाघात दमानिया यांनी केला असून या प्रकरणाने आता मोठे राजकीय वादळ निर्माण केले आहे.
खळबळजनक ऑडिओ क्लिप आणि चाकणकरांचा उल्लेख
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवून खळबळ उडवून दिली. या क्लिपमध्ये रुपाली चाकणकर यांचा संदर्भ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी त्यांना अटक करावी, अशी आक्रमक मागणी दमानिया यांनी केली आहे.
58 व्हिडिओ आणि लैंगिक शोषणाचे जाळे
दमानिया यांच्या मते, हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण झाले असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांच्या हाती 58 व्हिडिओ लागले आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा परत मिळवल्यास या गुन्ह्याची भीषण व्याप्ती समोर येईल, असे त्यांनी नमूद केले. देवाधर्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या या ‘विकृत बाबा’ला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुषमा अंधारेंच्या दाव्यांना समर्थन
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या ‘अनामिका’ (बोट) कापण्याच्या दाव्याचा संदर्भ दमानिया यांनी यावेळी दिला. खरातने स्वतःचे बोट कापून 3 महिने बँडेज लावण्याचे जे नाटक केले, त्यावरून त्याची मानसिक विकृती स्पष्ट होते, असे त्या म्हणाल्या. साडी नेसून आणि सभ्यतेचा मुखवटा घालून वावरणारी ही माणसे प्रत्यक्षात किती भयानक आहेत, हे त्यांच्या व्हिडिओंवरून सिद्ध होत असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.
जनतेला आवाहन आणि सरकारला इशारा
दमानिया यांनी हात जोडून जनतेला विनंती केली की, धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अशा कोणत्याही अघोरी प्रकारांना बळी पडू नका. तसेच, गृहखात्याने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता या प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करावा, असे आवाहनही त्यांनी केले. हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून अंजली दमानिया यांनी सादर केलेले पुरावे पाहता, तपास यंत्रणांवर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे.


