Ashok Kharat Property: नाशिकच्या कथित ‘भोंदू’ बाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता त्याच्या अफाट आणि बेहिशोबी मालमत्तेची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खरातने केवळ नाशिकमध्येच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातही कोट्यवधींची ‘माया’ जमवल्याचे उघड झाले आहे. ताज्या तपासानुसार, खरातच्या नावावर किंवा त्याच्या नातेवाईकांच्या नावे ३० हून अधिक मोक्याचे प्लॉट्स असून, या सर्व मालमत्तेची बाजारमूल्य अंदाजे ५०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी अफाट संपत्ती आली कुठून, या प्रश्नाने तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.
अशोक खरातने ही संपत्ती केवळ जमिनींमध्येच नाही, तर व्यवसायांमध्येही गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिन्नर-शिर्डी महामार्गावर त्याचे ‘शिवसंकल्प हार्डवेअर’ नावाचे एक भव्य दुकान असून, ते त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. या दुकानाची देखभाल त्याचा मेव्हणा करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या परिसरात खरातने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून, ज्या महागड्या भूखंडावर अघोरी प्रकार घडल्याचा आरोप आहे, त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे. खरातने आपली पत्नी, मुलगी आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावे या मालमत्तांचे जाळे विणले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, महिलांची फसवणूक आणि शोषणातून मिळालेल्या पैशातूनच हे अफाट साम्राज्य उभे करण्यात आले असावे. ५०० कोटींच्या या मालमत्तेची आता सखोल चौकशी होणार असून, यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा (EOW) हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे. भोंदूगिरीच्या आडून जमवलेली ही ‘काळी माया’ जप्त होणार का आणि या मालमत्तांच्या खरेदीमागे आणखी कोणा बड्या हस्तींचे हात आहेत का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


