इराणकडून कडक इशारा मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवरील नियोजित हल्ला स्थगित केला आहे, असा दावा इराणने केला. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका-इराण यांच्यातील सकारात्मक चर्चेमुळे लष्करी कारवाई पाच दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. पुढील निर्णय चर्चेच्या प्रगतीवर अवलंबून असतील. दोन्ही देश संघर्षाऐवजी राजनैतिक तोडग्याकडे वाटचाल करत आहेत.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. इराणवरील लष्करी हल्ले तात्पुरते थांबवण्यात आले असून, पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे, यावर आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. इराणकडून कडक इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची योजना स्थगित केली आहे, असा दावा इराणने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणने म्हटले आहे की, अमेरिका आमच्या इशाऱ्यामुळे घाबरली आणि त्यांनी आपली योजना बदलली. इराणच्या दूतावासाच्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला स्थगित करण्याचे आदेश दिले. इराणने हे स्पष्ट केले होते की, जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने म्हटले आहे की, ‘इराणकडून कडक इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मागे हटले.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारी कोणतीही संभाव्य लष्करी कारवाई पाच दिवसांसाठी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सकारात्मक आणि विधायक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील एक आठवडा ही चर्चा सुरू राहणार आहे. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
होर्मुज सामुद्रधुनीवरून आधी दिली होती धमकी
विशेष म्हणजे, या घोषणेच्या एक दिवस आधीच ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बाबत कडक इशारा दिला होता. त्यांनी सांगितले होते की, जर इराणने 48 तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील. मात्र आता चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अमेरिकेने हल्ले तात्पुरते थांबवले आहेत.


