Plane Crash : कोलंबियामधून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. सोमवारी हवाई दलाचे ‘सी-130 हरक्यूलिस’ हे लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत ६६ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण जखमी आहेत.
माहितीनुसार, १२५ सैनिकांना घेऊन हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले आणि त्यानंतर भीषण आग लागली. हे विमान पेरू सीमेच्या जवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो परिसरातून उड्डाण करत होते.
अपघात मानवी वस्तीपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर झाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे कोलंबियाच्या लष्करात आणि देशभरात शोककळा पसरली आहे.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.


