Maharashtra Heat alert : राज्यात मार्चच्या अखेरीस उन्हाचा तडाखा वाढू लागला असून उष्णतेचा धोका अधिक तीव्र होत आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारी 12 ते 5 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सोमवारी 36 अंशांपर्यंत गेलेला पारा मंगळवारी 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवणार असल्याचा अंदाज आहे.
तज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत बाहेर पडल्यास उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे आणि पुरेसे पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे.
दरम्यान, राज्यात हवामानाची दोन टोकांची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागात कडाक्याची उष्णता असताना, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत अवकाळी पावसाचे प्रमाण कमी होईल, मात्र उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


