Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही जणांनी थेट कार्यालयात घुसून तालुका अभियान व्यवस्थापकावर बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.
माहितीनुसार, आरोपींनी कार्यालयात प्रवेश करत अधिकाऱ्यावर अचानक हल्ला चढवला. या मारहाणीत संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, घटनेच्या वेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शरद थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत सोनईजवळील खेडले परमानंद येथे किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


