Eknath Shinde : राजकीय मतभेद कितीही टोकाचे असले तरी वैयक्तिक स्तरावर आदर राखण्याची महाराष्ट्राची परंपरा मंगळवारी विधानपरिषदेत पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही सदस्यांच्या निरोप समारंभात वातावरण भावूक झाले होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत उद्धव ठाकरे यांना ‘कोट्याधीश’ अशी उपमा दिली. त्यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अत्यंत थोडक्यात प्रतिक्रिया दिली.
शिंदे यांनी केवळ दोनच वाक्यांत उद्धव ठाकरे यांना निरोप देत “उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा,” असे म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी ‘साहेब’ असा उल्लेख करत आदर व्यक्त केला.
या वेळी शिंदे बोलत असताना उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नव्हते. तरीही त्यांच्या वक्तव्यातून वैयक्तिक कटुता बाजूला ठेवत सभागृहातील सुसंस्कृत वातावरण दिसून आले.
दरम्यान, विधानपरिषदेतील काही सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असून त्यांना निरोप देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


