Maharashtra Vidhansabha Seats : देशातील निवडणूक रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचे परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतात. प्रस्तावित बदलांनुसार, २०२९ पर्यंत महाराष्ट्रातील विधानसभा जागा २८८ वरून तब्बल ४३२ पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच लोकसभेच्या जागाही ४८ वरून ७२ पर्यंत वाढू शकतात.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बीजेडी, शिवसेना आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या प्रस्तावावर एकमत साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो. यामुळे लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर लोकसभेतील सदस्यसंख्या ८१६ पर्यंत वाढण्याची शक्यता असून महिला आरक्षणासाठी सुमारे २७३ जागा राखीव ठेवण्याचा अंदाज आहे.
जर या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळाली, तर आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन जागांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


