Ashok Kharat case: नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर एक स्फोटक पोस्ट शेअर करत थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. “मंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी त्यांनी या भोंदूबाबाकडून अघोरी विधी करून घेतले,” असा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी केला आहे.
डझनभर मंत्री अन् दोन डझन अधिकारी जेलमध्ये जाणार?
हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण म्हटले आहे. जर सरकारने या प्रकरणाचा प्रामाणिक तपास केला, तर सध्याच्या मंत्रिमंडळातील किमान १२ मंत्री आणि २४ बडे अधिकारी तुरुंगात जातील, असा दावा सपकाळ यांनी केला आहे. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला १.५ कोटी रुपयांचा सरकारी निधी देण्यात आला होता. तसेच फडणवीस कार्यालयातील तत्कालीन अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी निकटचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीसांना ६ महिन्यांपूर्वीच होती माहिती?
सपकाळ यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना या अघोरी कृत्यांची कल्पना गेल्या सहा महिन्यांपासून होती. “परंतु, जेव्हा फडणवीसांना समजले की त्यांचेच काही सहकारी आणि मित्रपक्षातील नेते त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र-मंत्र करत आहेत, तेव्हाच त्यांनी कारवाईचा बडगा उगारला,” असा आरोप काँग्रेसने केला आहे. आता या भोंदूबाबाच्या माध्यमातून फडणवीस आपल्याच पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
नरबळीचा संशय आणि पोलीस कोठडी
अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी धक्कादायक माहिती दिली. खरातने पाच नरबळी दिल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


