Ashok Kharat Case: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या कथित साम्राज्याला तपास यंत्रणांनी मोठा धक्का दिला आहे. भोंदूगिरीच्या जोरावर उभारलेल्या आर्थिक व्यवहारांची नाकेबंदी करण्यासाठी प्रशासनाने खरात याच्या ‘शिवानिका’ संस्थेचे मुख्य बँक खाते सील केले आहे. या कारवाईमुळे खरात याच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या असून, आता त्याच्या संपूर्ण संपत्तीची सखोल चौकशी (Financial Audit) सुरू झाली आहे.
मालमत्तेचा शोध आणि एसआयटी (SIT) कडून चौकशी
विशेष तपास पथकाने (SIT) खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती मागवली आहे. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेले जमिनीचे भूखंड, फ्लॅट्स आणि दुकाने यांचा समावेश आहे.
बड्या अधिकाऱ्यांशी असलेले लागेबंध येणार समोर?
तपास यंत्रणांच्या रडारवर केवळ खरातच नाही, तर त्याला पाठबळ देणारे ‘बडे प्रस्थ’ देखील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातचे काही IAS अधिकारी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि बड्या राजकारण्यांशी थेट संबंध असल्याचे समोर येत आहे. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने आपला ‘आर्थिक दरबार’ थाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
देणगीदारांची यादी होणार जाहीर
खरातला कोणी आणि किती मोठ्या रकमांच्या देणग्या दिल्या, याचा तपशील आता बँक खात्यांच्या तपासणीतून स्पष्ट होईल. काही व्यावसायिक उपक्रमांमध्ये त्याने भागीदारी केल्याचेही पुरावे मिळत आहेत. या आर्थिक कुंडलीमुळे खरातच्या काळ्या धंद्यात सामील असलेल्या अनेक पांढरपेशी लोकांचे चेहरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


