IPL 2026 Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बहुप्रतिक्षित IPL 2026 चे संपूर्ण वेळापत्रक अखेर अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी केवळ पहिल्या 20 सामन्यांची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता उर्वरित 50 सामन्यांसह संपूर्ण कार्यक्रमाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यानुसार, स्पर्धेची गट फेरी (League Stage) 24 मे पर्यंत चालणार असून देशातील 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिकेटचा हा महाकुंभ रंगणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 8 ‘डबल हेडर्स’चा धमाका
13 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात चाहत्यांना 8 ‘डबल हेडर्स’ची (एकाच दिवशी दोन सामने) मेजवानी मिळणार आहे. ज्या दिवशी दोन सामने असतील, त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3:30 वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटे आधी नाणेफेक (Toss) केली जाईल.
12 शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन; ‘होम ग्राउंड’मध्ये मोठे बदल
या हंगामात सामने केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित न राहता 12 केंद्रांवर खेळवले जातील. यामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ आणि जयपूरसह धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड या शहरांचाही समावेश आहे.
- पंजाब किंग्स: हा संघ आपले घरचे सामने न्यू चंदीगड आणि धर्मशाला येथे खेळणार असून, धर्मशाला येथे त्यांचे 3 सामने नियोजित आहेत.
- राजस्थान रॉयल्स: संघ आपले 4 घरचे सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळणार आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): आरसीबीने दोन होम ग्राउंडची निवड केली असून, ते बंगळुरूमध्ये 3 आणि रायपूरमध्ये 2 सामने खेळतील.
प्ले-ऑफच्या तारखांबाबत सस्पेन्स कायम
BCCI ने लीग फेरीचे सविस्तर वेळापत्रक दिले असले तरी, प्ले-ऑफ सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लीग फेरी 24 मे रोजी संपल्यानंतर लगेचच प्ले-ऑफचे सामने सुरू होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भातील अपडेट्स बोर्डाकडून लवकरच जाहीर केले जातील.


