Ashok Kharat Case: अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात सध्या एसआयटीच्या (SIT) कचाट्यात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या खरातने चौकशीदरम्यान अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दावे करण्यास सुरुवात केली आहे. “मी महिलांसोबत जे काही केले, तो केवळ एका विधीचाच भाग होता. मी कोणावरही जबरदस्ती केली नाही,” असा अजब दावा त्याने तपासादरम्यान केला आहे. स्वतःच्या कृत्याचे समर्थन करताना त्याने हा केवळ एक धार्मिक उपचार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘भले करायला गेलो आणि उलटले’ : खरातचा दावा
तपासाला सामोरे जाताना अशोक खरात स्वतःचा बचाव करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत आहे. चौकशीत त्याने म्हटले की, “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचे भले करायला गेलो, तेच लोक आता माझ्यावर उलटले आहेत.” विशेष म्हणजे, पोलीस कोठडीत असतानाही त्याने आपला ‘मंत्रजप’ सुरूच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “यापुढे मी केवळ माझ्या मेंदूचेच ऐकणार,” अशी पुटपुट त्याने पोलिसांसमोर केली असून, यातून तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
डिजिटल पुरावे आणि मोबाईल डेटा रिकव्हरी
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने आता तांत्रिक तपासावर आपला मोर्चा वळवला आहे. खरातचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यातील ‘डेटा रिकव्हरी’चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, पीडित महिलांशी संबंधित महत्त्वाचे चॅट्स, व्हिडिओ किंवा इतर तांत्रिक पुरावे हाती लागतील, असा विश्वास तपास पथकाने व्यक्त केला आहे. या डिजिटल विळख्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
आर्थिक नाड्या आवळल्या; बँक खाती व मालमत्ता सील
केवळ लैंगिक शोषणच नाही, तर खरातने जमवलेल्या अफाट संपत्तीचीही आता कसून चौकशी होत आहे. पोलिसांनी त्याच्या ‘शिवानिका’ संस्थेची सर्व बँक खाती गोठवली (Seal) असून, त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेली घरे, दुकाने आणि जमिनींची माहिती नोंदणी विभागाकडून मागवण्यात आली आहे. मालमत्ता खरेदीसाठी आलेला कोट्यवधींचा निधी नेमका कुठून आला आणि त्याचे आर्थिक स्रोत काय होते, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.
शस्त्र परवान्याचे गूढ आणि प्रशासकीय कारवाई
तपासादरम्यान खरातच्या फार्महाऊसवरून एक बंदूक आणि २१ काडतुसे जप्त करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनाने २०१२ मध्ये दिला होता आणि २०२४ मध्ये त्याचे नूतनीकरणही झाले होते. जप्त केलेल्या २१ काडतुसांपैकी ५ काडतुसे वापरलेली आढळल्याने खरातने नेमका गोळीबार कुठे आणि कशासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या हा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, ‘भविष्य’ सांगण्याच्या बहाण्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भोंदूचा खरा चेहरा आता कायद्यासमोर उघड होत आहे.


