MS Dhoni Injury: IPL 2026 च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. संघाचा कणा आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मैदानात दिसणार नाही. CSK संघाने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली असून, धोनीच्या दुखापतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
CSK ने सोशल मीडियाद्वारे दिली धोनीच्या दुखापतीची माहिती
चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धोनीच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे. धोनी सध्या पोटरीच्या स्नायूंच्या ताणामुळे त्रस्त असून तो ‘रिहॅबिलिटेशन’ प्रक्रियेतून जात आहे. संघाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “MS धोनी सध्या स्नायूंच्या ताणामुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपचार घेत आहे. परिणामी, तो IPL 2026 च्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये खेळू शकणार नाही. लवकर बरा हो, थाला!” या माहितीमुळे ‘थाला’च्या मैदानावरील एन्ट्रीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईचे पहिले चार सामने आणि वेळापत्रकाचे आव्हान
IPL 2026 चे बिगुल २८ मार्च रोजी वाजणार आहे. वेळापत्रकानुसार, चेन्नईला पहिल्या दोन आठवड्यांत चार महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. यात ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिला सामना होईल. त्यानंतर ३ एप्रिलला पंजाब किंग्स, ५ एप्रिलला RCB आणि ११ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामने होणार आहेत. ही परिस्थिती पाहता, धोनी किमान ४ ते ५ सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे संघाच्या रणनीतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
संजू सॅमसनवर यष्टिरक्षणाची मदार?
धोनी गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत असूनही संघासाठी सातत्याने खेळत आहे. मात्र, आताच्या दुखापतीमुळे त्याच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची धुरा कोणाकडे असेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हंगामात संजू सॅमसन यष्टिरक्षकाची महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. २०२५ चा हंगाम चेन्नईसाठी अत्यंत खराब राहिला होता, जिथे संघ गुणतालिकेत तळाला होता. अशा परिस्थितीत धोनीच्या अनुपस्थितीत संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


