Operation Tiger : राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची चिन्हं दिसू लागली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी 2022 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती.
दरम्यान, “कुछ तो बड़ा होने वाला है” असा मोठा राजकीय संकेत ज्योती वाघमारे यांनी दिला आहे. नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. तो ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन तुतारी असेल किंवा काही वेगळं, हे योग्य वेळी समोर येईल,” असे सूचक वक्तव्य केले.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतल्याने राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
एकूणच, “ऑपरेशन टायगर” की “ऑपरेशन तुतारी” याबाबतचा गूढ कायम असताना, राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे.


