Pune Crime News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना घडली आहे. दोन परदेशी विद्यार्थिनींचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओटीपी मागण्याच्या बहाण्याने आरोपी विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये शिरला आणि त्यानंतर त्याने अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.
ही घटना प्राध्यापकांच्या निवासस्थानी असलेल्या परदेशी विद्यार्थिनींच्या तात्पुरत्या निवासस्थानी घडली. याप्रकरणी सागर रोहिदास वाजे या डिलिव्हरी बॉयविरुद्ध चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच ही घटना सुरुवातीला दडवण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने केल्याचा आरोप समोर येत आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


