पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (Pimpri Chinchwad) आयुक्त विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांच्या एका वक्तव्यामुळे शहरात वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला (PCMC) जगात कोणी ओळखत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या या वक्तव्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.
औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे हे वक्तव्य असल्याची भावना नागरिक आणि पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे.
पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ (Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya Mandal) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त 2 एप्रिल ते 7 जूनदरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
आयुक्तांच्या वक्तव्यावर उपस्थित पत्रकारांनी तात्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे आशियातील प्रगत औद्योगिक शहर असताना शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर शहराच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला जात असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहराच्या प्रतिमेवर चर्चा
पत्रकार परिषदेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमाच्या मूळ उद्देशापेक्षा आयुक्तांच्या वक्तव्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहराची जागतिक ओळख नाकारल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या विषयावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.


