Unseasonal Rain : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांमध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अनियमित पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
राज्यातील विविध ठिकाणी वीज कोसळणे आणि बांधकाम कोसळण्याच्या घटनांमुळे जीवितहानी झाली आहे. जालना जिल्ह्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे भिंत कोसळून १४ वर्षीय मुलाचा जीव गेला. साताऱ्यात एका महिलेचा तर अहिल्यानगरमध्ये शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला.
नाशिकमधील मालेगावच्या वनपट गावात यश शिंदे हा आठवीचा विद्यार्थी गुरांच्या शेडजवळ उभा असताना अचानक भिंत कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात वीज कोसळून 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात विजा कडाडत असताना नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हवामान विभागाने पुढील २ ते ३ दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि विशेषतः विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


