Mumbai News : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेकडे आयुक्तपदाची धुरा सोपवली जात आहे.
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या भिडे या मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला.
आयुक्तपदासाठी डॉ. मिलिंद म्हैसकर, डॉ. संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांची नावे चर्चेत होती. मात्र, सुरुवातीपासूनच अश्विनी भिडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते.
१९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या भिडे यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणूनही ओळखले जाते. मुंबई मेट्रो प्रकल्प उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासह शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
दरम्यान, विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नव्या जबाबदारीनंतर मुंबई मेट्रो आणि अतिरिक्त मुख्य सचिव पदाची सूत्रे कोणाकडे दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


