Maharashtra Unseasonal Rain : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपीटीचा तडाखा बसत आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागांमध्येही वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.
पुढील ३ तासांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला आणि फळपिके बाधित झाली आहेत. आतापर्यंत सुमारे ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
दरम्यान, पुण्यातही वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून वाहतूक कोंडी झाली. पाषाण आणि लोहगाव परिसरात लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


