Accident News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी थेट ३० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
धारणी-परतवाडा मार्गावरील लवादा गावाजवळ हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. गावातील मजूर रोजच्या प्रमाणे टरबूज आणि खरबूज काढणीच्या कामासाठी पिकअप गाडीतून जात होते. अलई नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीने कठडे तोडत थेट नदीपात्रात कोसळली.
या अपघातात समाय सावलकर (४०) आणि मालती भिलावेकर (१८) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती येथे हलवण्यात आले आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत शाळेत जात असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. इसारवाडी-बिडकीन मार्गावर हा अपघात घडला असून संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सलग अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


