जर तुम्ही दररोज काही मिनिटे जरी दम लागेपर्यंत व्यायाम केला, तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अशा जोरदार शारीरिक हालचालींमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. जे लोक दररोज काही मिनिटे जरी जलद चालणे, पायऱ्या चढणे किंवा धावणे यांसारखा जोरदार व्यायाम करतात, त्यांना संधिवात, हृदयरोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी असतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही; अगदी लहान, सक्रिय हालचाली देखील प्रभावी ठरू शकतात. अशा व्यायामामुळे शरीरात असे बदल घडतात जे हलक्या व्यायामाने साध्य होत नाहीत. जेव्हा तुम्ही दम लागेपर्यंत सक्रिय असता, तेव्हा तुमचे हृदय अधिक प्रभावीपणे रक्त पंप करते, तुमच्या रक्तवाहिन्या अधिक लवचिक होतात आणि तुमचे शरीर ऑक्सिजनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करते. विशेषतः जोरदार व्यायामाचा, लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी सुमारे ९६००० लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
जे लोक अधिक जोरदार हालचाली करत होते, त्यांना अनेक आजारांचा धोका कमी होता, विशेषतः स्मृतिभ्रंशाचा धोका ६३ टक्क्यांनी, टाईप २ मधुमेहाचा धोका ६० टक्क्यांनी आणि मृत्यूचा धोका ४६ टक्क्यांनी कमी होता. वेगवेगळ्या आजारांमध्ये गतीचे परिणाम वेगवेगळे असतात. संधिवात आणि सोरायसिससारख्या दाहक रोगांमध्ये व्यायामाची तीव्रता अधिक महत्त्वाची असते, तर मधुमेह आणि यकृताच्या आजारांमध्ये व्यायामाचे प्रमाण आणि तीव्रता दोन्ही महत्त्वपूर्ण असतात.
आरोग्यात घडवू शकतो बदल
दिवसातून काही मिनिटांचा जोरदार व्यायाम देखील तुमच्या आरोग्यात मोठा फरक घडवू शकतो. जोरदार व्यायाम प्रत्येकासाठी योग्य नाही. विशेषतः वृद्ध व्यक्तींनी किंवा आधीपासूनच आजार असलेल्यांनी आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा आणि गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.


