Akola Crime : अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने पोलीस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लॉकअपमध्ये ठेवलेल्या एका आरोपी महिलेकडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेला पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. याच वेळी ड्युटीवर असलेल्या एएसआय राजेश जाधव यांनी संबंधित महिलेला तिच्या मुलीबाबत अत्यंत अश्लील प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे. “१० हजार रुपये देतो, मुलीला माझ्याकडे पाठव,” अशी मागणी केल्याचे महिलेनं सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेची बाजू ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. संतप्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला धारेवर धरत कानशिलात मारण्याचाही प्रयत्न केला, मात्र वर्दीचा मान राखत त्यांनी स्वतःला आवरले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित एएसआयवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या घटनेमुळे पोलीस ठाण्यातही महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा प्रश्न उपस्थित झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.


